Saturday, February 21, 2015

भाषा आणि अनुवादाचे पूल

Today is International Mother Language Day and our blog is turning multilingual today. We are hosting a series of blog posts by different authors, illustrators, parents, educators and children - sharing their thoughts on languages and more. International Mother Language Day is an observance held annually on 21 February worldwide to promote awareness of linguistic and cultural diversity and multilingualism. 2015 is the 15th anniversary of International Mother Language Day.


(This post was sent in by our editor Sandhya Taksale. Sandhya Taksale's essay talks about languages as well as translations serving as bridges between different languages and cultures.).

'भाषा आणि त्या भाषेतून पोचणाऱ्या गोष्टी' ही मुलांच्या उमलत्या वयात घडणारी एक अद्भुत गोष्ट असते. मातृभाषा किंवा घरात बोलली जाणारी भाषा ही मुलाला सगळ्यात जवळची! त्याच भाषेतली बडबडगीतं, आजीच्या गोष्टी, वाचून दाखवलेल्या गोष्टी यातून मुलांचं एक भावविश्व तयार होतं. भाषा हे ती गोष्ट कळण्याचं नुसतं माध्यम नसतं तर त्या माध्यमातून विचार आणि भावना यांची निर्मिती होते. म्हणूनच मूल त्या भाषेत विचार करायला शिकतं, स्वतःला व्यक्त करायला शिकतं. ही भाषा आनंदाचा ठेवा असते. म्हणूनच मुलांसाठी बोलताना, लिहिताना आपण कशी भाषा वापरतो त्यातून कसे व्यक्त होतो, काय सांगतो हा कळीचा मुद्दा ठरतो.

प्रत्येकाच्या मनात आपल्या भाषेला एक वेगळं स्थान असतं. अशा अनेक भाषा आणि कित्येक बोलीभाषा हे भारताचं वेगळेपण. आपली मातृभाषा मराठी आहे तर ती जपावी, वाढावी असं वाटतंच आपल्याला. मराठी रोजच्या व्यवहारात वापरणं, त्यात कविता आणि गोष्टी लिहिणं यातून ती भाषा फुलत आणि वाढत जाते. आपल्या भाषेवर जसं आपण प्रेम करतो तसंच इतर भाषांचा आदर करणं हेही महत्वाचंच आहे. भाषांमधली देवाणघेवाण ही शक्यता वाढवते. अनेक भाषा एकत्र वाढल्या तर त्याचं सुंदर इंद्रधनुष्य तयार होतं.

भाषांमधली देवाण घेवाण वाढवणारा कळीचा घटक म्हणजे अनुवाद.  हा साहित्यामधलाही एक महत्वाचं पैलू आहे. आपल्याच देशातले अनेक प्रांत किंवा दुसरे देश, त्यांची वेगळी जीवनपद्धती, वेगळे विचार या गोष्टी अनुवादातून आल्या तर आशय अधिक समृद्ध होतो. शिवाय आपल्या भाषेलाही अनुवाद समृद्ध करतो. आपल्या भाषेत हे सगळं वाचता आणि अनुभवता येणं ही मोठीच गोष्ट अनुवादामुळे घडते.

भारतीय भाषेत अधिकाधिक पुस्तकं येण्यासाठी अनुवाद हे एक चांगलं साधन ठरू शकतं. थोडी आकडेवारी दिली तर हा मुद्दा स्पष्ट होईल. भारतात आहेत ३० कोटी मुलं आणि या मुलांसाठी दरवर्षी प्रकाशित होतात फक्त १.५ कोटी पुस्तकं. भारतात भाषा आहेत २२ पण यातली बहुतांश पुस्तकं इंग्रजी आणि हिंदीत प्रकाशित होतात. याबाबत आणखी नेमकेपणानं बोलायचं तर भारतात प्रकाशित होणाऱ्या बाल पुस्तकांमध्ये ६० टक्के पुस्तकं ही इंग्रजी भाषेत असतात. मात्र आपल्याकडची सुमारे ७० टक्के मुलं ही सरकारी किंवा महानगरपालिकेच्या शाळेत जातात आणि त्या मुलांची इंग्रजी ही पहिली भाषा नसते. मुलांना आपल्या स्वतःच्या भाषेत पुस्तकं मिळण्याची गरज आणि प्रत्यक्ष संख्या यामध्ये केवढी मोठी दरी आहे हे सहज लक्षात येतं. अनुवादित पुस्तंक ही दरी भरून काढू शकतात. मुळात मराठी भाषेत मुद्रित स्वरूपात इसापकथा हे जे पहिलं पुस्तक आलं, ते इंग्रजीतून अनुवादित केलेलं होतं. इंग्रजीतून मराठीत आलेल्या पुस्तकांची तर भली मोठी यादीच देता येईल. त्या तुलनेत इतर  भारतीय भाषांतून मराठीत आलेली पुस्तकं कमी आहेत. साने गुरुजींची ‘आंतरभारती’ची संकल्पना इथे फार महत्वाची ठरते. आंतरभारती म्हणजे भारतीय भाषांमधली देवाण घेवाण, प्रेम आणि आदर! ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी अधिकाघिक प्रयत्न व्हायला हवेत. आपल्या भाषा वेगळ्या असल्या तरी त्यात एक बळकट, समान सांस्कृतिक धागा आहे. त्यामुळे अनुवादित असुनही ते साहित्य परकं वाटत नाही. मुलं त्यांच्याशी पटकन सांधा जुळवू शकतात, त्यातली मजा लुटू शकतात. वेगळी भाषा, प्रांत, वर्ग यापलीकडे जाऊन एकमेकांमध्ये पूल बांधले जाण्याची शक्यताही त्यात आहे.

ही शक्यता स्वागतार्ह अशीच आहे आणि आत्ताच्या वातावरणात तर त्याची गरज कधी नव्हे एवढी जाणवते आहे. सध्या परिस्थती अशी आहे, की एकमेकांच्या भाषेचा द्वेष करायला आपण मुलांना जणू शिकवतो. स्वतःच्या भाषेचं प्रेम, आस्था असणं हा भाग वेगळा (तसं ते असतं तर मराठीची दूरावस्था का झाली असती?) आणि भाषेच्या अस्मितेचं राजकारण करणं हा भाग पूर्ण वेगळा. आपल्या प्रांतावर प्रेम करण्याऐवजी दुसऱ्यांचा द्वेष इथे आधी येतो. मुंबईत ‘हा दाक्षिणात्य, याला हाकला.’ ‘हा बिहारी, त्याला चोपा’ या भूमिका राजकारणाचा भाग म्हणून वापरल्या जातात. मुलांच्या वाढीच्या वयात जर इतर भाषांमधली पुस्तकं मातृभाषेतून हाती आली, तर दुसऱ्या प्रांतातल्या लोकांचा असा द्वेष मुलं करणार नाहीत. जे द्वेष पसरवतात त्यांना आव्हान देणारे प्रश्नही कदाचित ती विचारतील.

उदाहरण दिलं तर हे जरा स्पष्ट होईल. ‘लक्ष्मणचे प्रश्न’ हे सात ते दहा वयोगटातल्या मुलांसाठी लता मणि या दाक्षिणात्य लेखिकेनं लिहिलेलं आणि 'प्रथम बुक्स' नं पाच भाषांत प्रकाशित केलेलं गोष्टीचं पुस्तक. अर्थातच वातावरण कर्नाटकातल्या खेडेगावचं आणि शेतातलं. पण मराठी मुलांना वाटतं, ‘अरे हा लक्ष्मण आपल्यासारखाच आहे.’ त्याच्या आजीचं नाव पच्चमा म्हणजे जरा वेगळंच आहे आणि ती चित्रात दिसतेही वेगळी पण नातवावरचं तिचं प्रेम मात्र आपल्या आजीसारखंच आहे. दुसरं पुस्तक आहे ‘कल्लूचे किस्से’ नावाचं. सुभद्रा सेनगुप्ता या लेखिकेचं. हा कल्लू आहे उत्तरेकडला आणि खट्याळ. तो आणि त्याचे मित्र यांचे सतत काहीतरी कारनामे चालू असतात. रामलीलेच्या तंबूत ते धमाल उडवून देतात. तो कुठचा, काय भाषा बोलणारा, कोणत्या धर्माचा हे प्रश्नचं इथे फिजूल ठरतात आणि मुलांना तो आवडतो. शक्यता अशी आहे, की उद्या भाषा, प्रांत यावर त्यांना कुणी भडकावून देण्याचा प्रयत्न केला तर कदाचित ही मुलं त्याविरोधात प्रश्न विचारतील. आंधळेपणानं काही स्वीकारणार नाहीत.

आणि आणखीही एक  लक्षात येतेय का तुमच्या? ‘शेजाऱ्यावर प्रेम करा.’ ‘आम्ही सर्व भारतीय बांधव आहोत’ अशी पोपटपंची करून जे कळत नाही, उपदेशाचे डोस देऊन जे साधत नाही ते काम चांगली गोष्ट किंवा कथा करु शकते. शिवाय कुठेही ‘असं वागा बरं का मुलांनो’ हे अजिबात न सांगता किंवा सुचवता!

थोडक्यात, वेगळ्या वाचनाचा आनंद मिळवून देणं, भाषा आणि साहित्य समृद्ध करणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एकमेकांची संस्कृती आणि अंतरंग यांच्यापर्यंत पोचणारे पूल निर्माण करणं हे काम आजवर अनुवादानं केलं आहे. ते आणखी जोमानं व्हायला हवं.

Illustration by : Priya Kuriyan

blog comments powered by Disqus